20 हजार उमेदवारांना प्रशिक्षण

 कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध ३६ अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात २० हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा आज (गुरुवार) मुख्यमंत्री यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळात आपण आरोग्य क्षेत्रासाठी सोयी-सुविधांची मोठ्या प्रमाणात उभारणी केली आहे. पण या सोयी-सुविधा चालवणारे प्रशिक्षीत मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याचा उपयोग होत नाही. आता कौशल्य विभागाने सुरु केलेल्या उपक्रमातून हे मनुष्यबळ तयार होण्याबरोबरच राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

राज्यातील ३४८ वैद्यकीय महाविद्यालये, शासकीय रुग्णालये तसेच उत्कृष्ट खासगी रुग्णालयांना प्रशिक्षण केंद्र म्हणून नोंदीत करण्यात आले आहे. या माध्यमातून प्रशिक्षणासह ऑन जॉब ट्रेनिंग पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याकरीता सर्व जिल्ह्यांमध्ये एकूण ५०० प्रशिक्षण केंद्रे कार्यन्वित करण्यात येणार आहेत. या केंद्रांमधून २० हजार उमेदवारांना प्रशिक्षण देण्याचे उद्धिष्ट आहे.

यातील ५ हजार उमेदवारांना पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण देण्यात येईल. दर्जेदार पायाभूत सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये उमेदवारांना हे प्रशिक्षण स्थानिक पातळीवरच उपलब्ध होईल. प्रशिक्षणाचा लाभ घेण्याकरिता राज्यातील युवक, युवतींनी कौशल्य विकास विभागाच्या https://www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments